। पनवेल । प्रतिनिधी ।
भरधाव डंपरने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर त्याचा सहकारी जखमी झाल्याची घटना तळोजा एमआयडीसीतील आयजीपीएल चौकाजवळ घडली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव चूमनकुमार जगदीश महतो (29) तर जखमी झालेल्या त्याच्या सहकाऱ्याचे नाव बिकेशकुमार नवलकिशोर शर्मा (29) असे आहे. सदर दोघेही मुळचे बिहार राज्यातील असून, सध्या ते पनवेल मधील तोंडरेगाव येथे राहण्यास होते. चूमनकुमार आणि बिकेशकुमार दुचाकीवरुन नागझरी येथील एफजी ग्लास कंपनीत ड्युटीसाठी जात होते. यावेळी तळोजा एमआयडीसीतील आयजीपीएल चौकाजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात चूमनकुमार महतो याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र बिकेशकुमार शर्मा जखमी झाला. या घटनेचा पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत.







