शार्लोट लेकमध्ये पाणी दहा फुटाच्या खाली
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात ब्रिटिशांनी बांधलेले शार्लोट लेक तलावाने तळ गाठला आहे. तलावातील पाणी दहा फुटाच्या खाली गेले असून, तलावात पाण्याच्या सोबत माती अधिक प्रमाणात साठलेली आहे. त्यामुळे माथेरानवर पाणी संकट आले आहे असून, पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. दरम्यान माथेरान शहरासाठी उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी हे जास्तवेळ उचलावे लागणार असून, सतत खंडित होणारा वीज पुरवठा माथेरानकर यांच्या तोंडचे पाणी पळवून नेण्याची शक्यता आहे.
माथेरान या थंड हवेचे ठिकाणी तेथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी शार्लोट लेक तलाव बांधला. या तलावाच्या पाण्यावर पूर्वी माथेरान मधील जनजीवन सुरळीत चालत होते. पुढे ही थंड हवेचे ठिकाण पर्यटनस्थळ झाले आणि माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखात पोहचली. त्यामुळे शार्लोट लेक तलाव कमी पडू लागला. पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नेरळ जवळील कुंभे येथून उल्हास नदीमधून पाण्याचा उपसा केला जातो आणि 800 मीटर उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये पोहचवला जाते. मात्र, सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने माथेरानमध्ये उल्हास नदीचे पाणी वेळेवर पोहचत नाही. त्यात यावर्षी जास्त वेळ शार्लोट लेक मधून पाणी उचलले गेले असून, शार्लोट लेक ने तळ गाठला आहे. शार्लोट लेकमध्ये असलेल्या पाण्याची स्थिती माथेरान शहरावर पाण्याचे संकट आले असल्याची जाणीव करून देणारे आहे. तलावात जेमतेम दहा फूट पेक्षा कमी पाणी साठा असून, तलावात पाण्याबरोबर माती जास्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शार्लोट लेकमधील पाणी हे डेड वॉटर समजले जात आहे. त्यामुळे तलावात असलेल्या पाण्याचा कोणताही फायदा माथेरानमधील पाणी ग्राहकांना सध्यातरी नाही.
त्यामुळे माथेरानमधील शार्लोट लेक सध्या पाण्यासाठी नाही हे स्पष्ट होत असून, माथेरान शहरातील नागरिकांचे डोळे या निमित्ताने पावसाकडे लागले आहेत. सध्या पावसाची कोणतीही लक्षणे नाहीत आणि त्यामुळे तलावात असलेले गाळ, माती आणि दगड काढण्याची मोठी संधी नगरपरिषदेला मिळून आली आहे. त्यात केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून तलावातील गाळ काढण्याचे काम मंजूर आहे, ते काम ठेकेदाराने केले नाही हे तलावातील माती गाळ पाहून दिसून येत आहे. यावर्षी पावसाला लांबला असल्याने नगरपरिषदेने ठेकेदाराला गाळ काढण्याची कामे सुरू करण्यास सांगावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु, लेक संवर्धन कामाचे ठेका घेणाऱ्या ठेकेदारावर माथेरान नगरपरिषदेची कृपादृष्टी असल्याने तलावातील गाळ काढला जाणार की पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाणार? अशी चर्चा जागतिक नागरिकांकडून सुरू आहे.







