। मुंबई । प्रतिनिधी ।
मुलुंड परिसरात शनिवारी (दि. 07) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. रस्त्यावर फलक लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना एका बीएमडब्ल्यू कारणे जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ मंडळाचे कार्यकर्ते प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे फलक लावत होते. त्याचवेळी एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने आली आणि तिने त्या दोघांना जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. या अपघातात प्रीतम थोरात यांचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर कारचालक तिथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस कारचा आणि चालकाचा शोध घेत आहेत.