१८ प्रवाशांसह चालक, वाहक जखमी; दोन्ही बसचे नुकसान
। नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यासमोर दोन एसटी बसची एकमेकांना धडक झाली. या अपघातात कोकणात जाणाऱ्या एसटी बसमधील सुमारे 18 प्रवासी व दोन्ही एसटी बसचे चालक, वाहक जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 07) मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक मलिनाथ काशिनाथ कलशेट्टी (44) हे परळ ते राजापूर चाकरमानी प्रवाशांना घेऊन जात होते. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यासमोर आले असता योगेश हिरालाल शिरसाट (34) हे प्रवाशी सोडून आपली रिकामी बस दहिवली (चिपळूण)-ठाणे अशा परतीच्या प्रवासादरम्यान मुंबईकडे परतत होते. त्याचवेळी योगेश शिरसाट यांचे एसटी बसवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या परळ-राजापूर या एसटी बसला समोरासमोर धडक दिली. या अपघातात परळ-राजापूर या एसटी बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही एसटी बसचे चालक, वाहक जखमी झाले असून दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातातील जखमींची नावे
श्रीकांत सिताराम चव्हाण (62), सई योगेश चव्हाण (12), सुवर्णा श्रीकांत चव्हाण (60), भरत चंद्रकांत सावंत (41), गीता भरत सावंत (34), अमोल शिवाजी बापर्डेकर (33), अमृता अमोल बापर्डेकर(27), अश्विनी अजित शिगन (40), विद्या नारायण जाधव (40), शशिकांत आनंत जुलुम (49), राखी शशिकांत जुलुम (25), राकेश काशिनाथ जुलुम (20), श्रावणी दीपक पनवीरकर (29), स्वप्निल भगवान चव्हाण (36), प्रसाद शंकर बंदरकर (34), मनोज मनोहर सतोने (29), मेघना महेश साबळे (35), सार्थक महेश साबळे (12).