। पालघर । प्रतिनिधी ।
उल्हासनगरात काही बोगस ऑटो रिक्षा चालकांची अरेरावी वाढली आहे. शुक्रवारी भर रस्त्यात काही ऑटो चालकांनी उड्डान पुलावर एका अल्पवयीन मुलीच्या दुचाकीला धडक मारून तिला मारहाण केली. तसेच, गाडीची चावी हिसकावण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा चालकांनी पोलिसांनाच भर रस्त्यात मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी एका रिक्षा चालकाला ताब्यात घेतले.
कॅम्प नंबर तीन आणि चारला जोडणार्या शाहू महाराज उड्डान पुलावर एक लहान मुलगी जात असताना एका रिक्षा चालकाने या मुलीच्या दुचाकीला धडक मारली तसेच गैरवर्तन केले. नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर तैनात असलेले मोहन पाटील तसेच इतर दोन वाहतूक पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी रिक्षा चालकाचा पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी पोलिसांनी चालकाला पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले असता चालकाने मोहन पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. बचावासाठी आलेले वाहतूक पोलीस वाघ आणि वार्डन संदीप यांना देखील मारहाण तसेच शिविगाळ करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती पोलीस तातडीने या ठिकाणी आले असता त्यांनी ऑटोचालकाला ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.