। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील प्रधानमंत्री सुक्ष्म 2.0 योजनेतून तालुक्यातील अकरा गावातील 25 शेतकरी गटांच्या माध्यमातून 500 शेतकर्यांच्या सदस्यांमधून दहा संचालकाची निवड करण्यात आली आहे. तळा कृषी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या कंपनीच्या अध्यक्षपदी विलास कदम, उपाध्यक्षपदी आप्पा दळवी तर कोषाध्यक्ष पदी कृष्णा भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, मृद व जलसंधारण अधिकारी मंगेश साठे, आशा मोहीते, आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. कृषी, पणन, जलसंधारण, अशा माध्यमातून शेतकरी उत्त्पादक कंपनीने आपल्या सर्व सदस्यांना हाताला काम मिळेल त्याचबरोबर कंपनीची आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी प्रत्येकाने परिश्रम घेतले पाहीजेत. यासाठी प्रयत्नात कुठे कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शासनाच्या माध्यमातून ही कंपनी येत्या तीन वर्षांत आपली प्रगती साधेल आपला पाया मजबूत करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कंपनीच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आपल्या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करण्यासाठी 500 हेक्टरवर जबाबदारी घ्यावी, असे सांगण्यात आले. याबाबत शेतकरी बांधवाना विश्वासात घेऊन यावर विचार केला जाईल, असे ठरविण्यात आले.