। पालघर । प्रतिनिधी ।
जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांना जोडणार्या नाशिक-डहाणू राष्ट्रीय महामार्गावर घाटकपाडा गावाशेजारील वाघ नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जर वेळीच या खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे.
नाशिक-डहाणू महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली असून गुजरात राज्यातून आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या सुद्धा अधिक आहे. तर, रोजच मोखाड्याहून जव्हारला ये-जा करणारे विद्यार्थी, चाकरमानी, रुग्ण, कार्यालयीन कर्मचारी यांची वर्दळ अधिक असते. मात्र, वाघ नदीच्या पुलावरील उताराजवळ दोन खड्डे असल्याने उतारावरून येणारी वाहने वेगाने येतात आणि जोरात आदळतात. यामुळे वाहनांचे तर नुकसान होतेच, परंतु वाहनातील प्रवाशांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे या रस्त्याची सुधारणा अवघ्या दोन वर्षांपूर्वी केलेली असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने खड्डे पडतात कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यामुळे या खड्ड्यांची दुरुस्ती करावी यासाठी प्राधिकरणने ठेकेदाराला वेळीच आदेश देऊन खड्डे बुजवून घेतले पाहिजेत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.