भाजीचा टेम्पो उलटून एक ठार, तीन जखमी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर नागाव-विन्हेरे रस्त्यावर काटेतळीनजीक भाजीवाहतूक करणारा टेम्पो उलटून एकाचा मृत्यू, तर तीनजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.14) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलादपूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत विलास पिसाळ ओझर्डे हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो (क्रमांक एम एच 11डी डी 9762) यामध्ये वाई येथून भाजीपाला भरून चार प्रवासी बसवून पोलादपूर बाजूकडून काटेतळी मार्गे विन्हेरे रस्त्याकडे जाताना काटेतळी हद्दीत आला असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अतिवेगाने, बेर्पर्वाईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तीव्र चढाच्या वळणावर आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटून टेम्पो कलंडून अपघात घडला.

या अपघातात आनंदा अंकुश कारंडे (45) सातारा यांचा जागीच मृत्यू झाला तर तुषार लालसिंग भिलारे (28)जावळी, राजेंद्र बबन गाडवे (55) वाई, सुमन अशोक जमदाडे (50) वाई असे तिघेजण जखमी झाले. या अपघाताबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक घुले हे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

पोलादपूर शहरातील कविंद्र परमानंद स्मारकाच्या उद्घाटनावेळी तत्कालीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन होऊन पूर्णत्वास गेलेल्या काटेतळी नागाव विन्हेरे रस्त्याचे रूंदीकरण होऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला करंजाडी रेल्वे स्थानकापर्यंत जोडण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुकावासियांकडून होत आहे. मात्र, या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष चालले होते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या अपघाताने पोलादपूर काटेतळी रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे.

Exit mobile version