। पेण । प्रतिनिधी।
सांडपाणी व सेवा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात चालढकलपणा करणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणाचा निषेध करून कांदळेपाडा ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आणि राजकीय पुढार्यांना गावबंदीचा एकमुखी ठराव घेतला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पेण यांना 12 एप्रिल रोजी देण्यात आले आहे.
कांदळेपाडा ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर मंगळवारी (दि.16) उपविभागीय कार्यालय पेण येथे कांदळे ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरण यांच्यामध्ये संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला प्राधिकीकरणाचे अधिकारी तसेच प्रतिनिधी सोडून स्वत: उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ उपस्थित होते. कांदळेपाडा ग्रामपंचायतीकडून सरपंच मुरलीधर भोईर, उपसरपंच अविनाश भोईर, दिलीप भोईर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते हजर होते. उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी संबंधित अधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकार्यांनी त्यांचा फोन घेतला नाही. राष्ट्रीय प्राधिकरणाकडून जाणीवपूर्वक चालढकलपणा करण्यात येत असल्याने अखेर संतप्त गावकर्यांनी राजकीय पुढार्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. जोपर्यत कांदळेपाडा ग्रामस्थांच्या सांडपाणी व सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत राजकीय पक्षाच्या पुढार्यांना गावात घ्यायचे नाही आणि मतदान करायचे नाही, असा एकमुखी ठराव कांदळेपाडा ग्रामस्थांनी घेतला आहे.







