। मुंबई । वृत्तसंस्था ।
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट प्रमाणात नफा मिळेल, असे सांगून एका जेष्ठ महिलेची कोटी रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वरळी परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक महिलेला एक सोशल मीडिया लिंक मिळाली. या लिंकद्वारे आश्वासन दिले होते की, शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे भरीव नफा मिळू शकतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर महिलेला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शेअर बाजारातील नफ्यावर चर्चा करण्यात आली. ग्रुपवर झालेल्या चर्चेनंतर महिलेने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
यात पीडित महिलेने 1 कोटी 92 लाख रुपये गुंतवले. त्यानंतर आरोपीने त्यांना आणखी 2 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. आर्थिक अडचणीचे कारण देत ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेने नकार दिला. त्यानंतर आरोपीने 50 टक्के सूट दिली. त्यामुळे महिलेच्या मनात याविषयी शंका आली.
पीडित महिलेला सुरुवातीला असे सांगण्यात आले कि, तो कर्म कॅपिटल शेअर ट्रेडिंग लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे गुंतवणूक करत आहे. त्यानंतर कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना समजले की, गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी कंपनीच्या नावावर एक फसवे खाते तयार केले गेले आहे. नंतर या फसवणुकीची तक्रार वरळी येथील मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांना देण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी घाटकोपर येथील सुरेंद्र सुर्वे (51) याला अटक केली. आरोपी पेशाने चित्रकार असून त्याला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.