नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

ऑनलाईन फ्रॉड करणारे ठग नवीन कोणते ना कोणते साधन आजमावतच असतात. अशाच प्रकारे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या ठगांनी आता नटराज पेन्सिल कंपनीच्या नावाने नवीन फ्रॉड करण्याचा धंदा सुरू केला आहे.

नटराज कंपनीच्या पेन्सिल किंवा पेन पॅक करण्याचे काम आपणाला मिळेल. काम आपल्याला घरपोच दिले जाईल व महिन्याला या बदल्यात आपल्याला 30 हजार रुपये मिळतील, अशा प्रकारे फोनवरती हे लोक बतावणी करत असतात. पहिले आपले नाव रजिस्टर करण्यासाठी रुपये 650 रूपये ऑनलाईन टाकायला सांगतात. त्यानंतर आता माल घेऊन आमची गाडी निघणार आहे. त्यासाठी इन्शुरन्सचे 2 हजार 599 रुपये त्वरित ऑनलाईन टाका. अशा प्रकारे सांगण्यात येते. आपण इन्शुरन्सचे पैसे ऑनलाईन टाकल्यानंतर सातारा येथून माल घेऊन गाडी लगेच निघेल व चार ते पाच तासांमध्ये आपल्याकडे माल देऊन जाईल. या गाडीसोबत पॅकिंग कशी करायची हे दाखवण्यासाठी एक महिला व एक पुरुष देखील उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे आपल्याला कामासाठी 15 हजार रुपये ऍडव्हान्स कॅश देखील या गाडीसोबत पाठवण्यात येईल. तसेच एक नवीन मोबाईल सेट सुद्धा देण्यात येईल. असे आपल्याला फोनवरून सांगण्यात येते व तशा प्रकारचे फोटो व व्हिडिओ देखील आपल्याला पाठवण्यात येतात. त्यामुळे फसवणुक करणाऱ्या व्यक्ती आपण पैसे लवकरात लवकर ऑनलाईन टाका असे सांगत असतात. मात्र, तो माल काही आपल्यापर्यंत पोहोचत नाही. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव विपिन वर्मा असे येत असले तरी, ट्रू कॉलर वर नाव शोधले असता मोमीन नावाचा मोबाईल नंबर आढळून येतो. तसेच, चंचल कुमारी व मुबारक अशी नावे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पाठवलेल्या स्कॅनरवर दिसून येते.

Exit mobile version