| रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाल पसरले असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
रोहा शहरातील खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला ऑनलाईन चक्री जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन हा अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी येथील स्थानिक सोसायटीतील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.शेतकरी कामगार पक्षाने ऑनलाईन जुगार व चक्रीजुगार बंद करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता.याशिवाय रोहा शहर व तालुक्यात खुलेआम मटक्याचे अड्डे सुरू असल्याने या गोष्टींना पोलिसांचा पाठिंबा आहे का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.