पोलीस यंत्रणेचे कारवाईकडे दुर्लक्ष
| पेण | प्रतिनिधी |
शहरात चक्री जुगार व व्हिडीओ गेमचे मायाजाळ पसरलेले असून, अनेक विद्यार्थी परीक्षा संपल्याने फावल्या वेळात व्हिडीओ गेमच्या कॅफेमध्ये दिसत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जुगारवेडे तरुण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगार व ऑनलाइन लोटो, ऑनलाईन गेमकडे खाकीवाल्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याने या अवैध धंद्याना बळ मिळत आहे, असा आरोप पेणकरांकडून होत आहेत. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या चक्री जुगारामुळे व ऑनलाईन गेममुळे अनेक तरुण मुलं व अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
शहरातील बसस्थानकासमोर, भूमी कॉमप्लेक्स, नंदीमाळ नाका, चावडी नाका, देवआळी, बौद्धवाडा, नरदास चाळ येथे चक्री जुगार, व्हिडीओ गेम राजरोजपणे सुरु असून, या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने खाकीवाल्यांनी तातडीने या जुगारावर कारवाई करुन अवैध चक्री जुगार बंद करावा, अशी मागणी शहरातील नागरिक व महिलावर्गाकडून केली जात आहे.