अलिबाग, पेण व पनवेल तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
करोडो रुपये खर्च करून जिल्ह्यात जलजीवन योजना राबविण्यात आली. मात्र आजही या तीन तालुक्यातील 22 हजार नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेण व पनवेल या तीन तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 53 ठिकाणी 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात 10 गावे व 43 वाड्यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांच्या योजना राबवूनही नागरिकांच्या घशाला पडणारी कोरड मात्र कायम असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
रायगड जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा प्रशासनामार्फत वारंवार केल्या जातात. पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजना राबवून गावे, वाड्यांमधील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत कायमच करण्यात आला आहे. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचा कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रति व्यक्ती 55 लीटर पाणी प्रमाणे पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे गावांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. अनेक गावांमध्ये योजना राबवून विहिरी, पाणी साठवण टाकी बांधण्यात आली. मात्र आजही काही गावे पाण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणांमधून माती मिश्रीत पाणी पुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
राज्यातील एक हजार 239 गावांमध्ये टँकर
राज्यातील धरणांनी तळ गाठला असून धरणांमधील पाणीसाठा सरासरी 30 टक्क्यांवर आहे. जमिनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवरील हातपंप बंद पडले असून ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या विहिरींमधील पाणी खोलवर गेले आहे. या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढत असून सध्या राज्यातील 15 जिल्ह्यांमधील एक हजार 239 गावांसह दोन हजार 779 वाड्या-वस्त्यांना एक हजार 532 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.रायगड जिल्ह्यात 13, पालघरमध्ये 13, धुळ्यात पाच, जळगाव जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 38, अमरावतीत एक, बुलढाण्यात 27 टँकर सुरु आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत 84 गावे आणि 209 वाड्यांवर टँकर सुरु झाले आहेत. सध्या सुरु असलेल्या एक हजार 532 टँकरमध्ये साडेचौदाशे टँकर खासगी आहेत. गतवर्षी 1 एप्रिल रोजी राज्यातील अवघ्या 59 गावांमध्ये 68 टँकर सुरु होते. यंदा मात्र साडेबाराशे गावांमध्ये साडेपंधराशेपर्यंत टँकर सुरु असल्याची वस्तुस्थिती आहे.
तालुके - गावे - वाड्या - टँकर - लोकसंख्या
अलिबाग - 02 - 00 - 01 - 5,439
पेण - 02 - 36 - 02- 06 - 3,942
पनवेल - 06 - 07 - 06 - 12,884
एकूण - 10 - 43 - 13 - 22,265
जिल्ह्यातील अलिबाग, पेण व पनवेल या तीन तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत अलिबागमधील दोन गावे, पेणमधील 02 गावे, 36 वाड्या, पनवेलमधील सहा गावे, सात वाड्यांमध्ये 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या गावे, वाड्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्या गावात टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अतंर्गत वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. अनेक योजना पूर्णत्वास आहेत. काही योजनांची कामे प्रगती पथावर आहेत.
संजय नार्वेकर
कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद