| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा टाईम्स लिस्ट ऑफ 100 लीडर यादीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीतील हरमनप्रीत कौर ही एकमेव भारतीय क्रिकेटर आहे. हरमनप्रीत कौर ही विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि केएल राहुलवर देखील भारी पडली.टाईम्सच्या 100 प्रेरणादायी लीडर मध्ये कौरचा समावेश हा इनोव्हेटर्स या श्रेणीत करण्यात आला आहे. कौलसोबत या यादीत एन्जल रीसे, मेट्रो बूमिन, केट रायडर, मीरा मुर्ती आणि जेम्स मेयनार्ड यांचा देखील समावेश आहे. जेव्हापासून हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठी उंची गाठली आहे.
कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2023 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहचला. याचबरोबर पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपदही पटकावून दिलं. आता कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ एशियन गेम्समध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची एशियन गेम्समधील मोहीम ही 21 सप्टेंबरला सुरू होणार आहे. कौरच्या नेतृत्वाखालील संघात स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष या स्टार खेळाडू खेळणार आहेत. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. गेल्या दोन वर्षापासून कौरच्या नेतृत्वाखालील संघाने चांगली कामगिरी केली आहे. आता एशियन गेम्समध्ये विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. कारण भारतीय महिला संघाचे आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये वरचे स्थान आहे.
एशियन गेम्ससाठीचा भारतीय महिला क्रिकेट संघ
हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, रिचा घोष, अमनज्योत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिनू मानी, कनिका अहुजा, उमा छेत्री, अनुशा बारेड्डी.