दोन फेऱ्या रद्द
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानकरांसाठी उपायुक्त मानली जाणारी शासनाची मिनीबस ऐन सणासुदीत बिघाड झाल्याचे कारण पुढे करत दोन फेऱ्या रद्द केल्याने मिनीबससाठी ताटकळत उभे असलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
माथेरानमधील नागरिकांची जीवनवाहिनी ठरत असलेल्या मिनीबसला अचानक बिघाड झाला. सकाळी 6:30 माथेरानहून कर्जतकडे सुटणारी मिनीबसच आली नाही, त्यामुळे शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच सकाळी 8:15 ला कर्जतहुन माथेरानकडे सुटणारी एसटी मिनीबस ही सुद्धा कर्जत एसटी स्थानकातच रद्द करण्यात आली त्यामुळे गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या स्थानिकांचे हाल झाले. शेवटी शंभर रुपये माणसी खर्च करून खासगी वाहनाने नेरळ येथे खरेदी करण्यासाठी जावे लागले.
आमचे कॉलेज सकाळी सातचे असते. त्यामुळे आम्ही सकाळीची पहिली मिनीबस पकडतो. पण मिनीबस आलीच नसल्याने आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
ऋषी राजू जाबरे, विधार्थी
आम्ही सकाळच्या दोन फेऱ्या बिघाड झाल्यामुळे रद्द केल्या. यासाठी लागणारे साहित्य आम्ही रामवाडी पेण येथून मागवले आहे. ते आल्यानंतर ती दुरुस्त करून ती तात्काळ सुरू केली जाईल.
देवानंद मोरे, आगार व्यवस्थापक