उरणमध्ये खुलेआम गुटखा विक्री

कारवाई होत नसल्याने टपरीधारक निर्धास्त

| उरण | वार्ताहर |

गुटखा, पान मसाला यासारख्या मानवी शरीरावर दुष्परिणाम करणार्‍या अन्न पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली. या गोष्टीला तब्बल 11 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही कित्येक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा, पान मसाला विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान, उरण तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखा, पान मसाला विक्री करणार्‍या टपरीधारकांवर कारवाई होत नसल्याने ते खुलेआम विक्री करत असल्याची चर्चा आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या उरण तालुक्यात शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री पाहायला मिळत आहे. कारवाईच्या भीतीने शहरी भागात गुटखा, पान मसाला छुप्या पद्धतीने विकला जात आहे. मात्र, उरणच्या ग्रामीण भागात पोलीस प्रशासन, अन्न नागरी औषध प्रशासन यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने खुलेआम त्याची विक्री होत आहे. यावर पालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाने कायमची बंदी घालावी, अशी मागणी उरण परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन ग्रामीण भागात फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील गुटखा पान मसाला विक्रेत्यांना रानच मोकळे झाले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या अनेक पानटपर्‍यांवर, दुकानात गुटखा, पान मसाल्याची विक्री खुलेआम होताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे छुप्या व खुलेआम पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात असो कुणी चुकीचं कृत्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच.

मारुती घोळसवाड, सहाय्यक आयुक्त,
अन्न औषध नागरिक प्रशासन
Exit mobile version