अलिबागचा कांदळवन विभाग निद्रावस्थेत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खारफुटी आणि कांदळवनांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा असतानाही अलिबाग तालुक्यात सरकारी खारफुटीची खुलेआम कत्तल आणि अतिक्रमण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालव परिसरातील सरकारी खारफुटीवर अतिक्रमण झाले असून, आक्षी येथे खासगी शेतजमिनीत बेकायदेशीर घुसखोरी करून अनधिकृत कुंपण उभारण्यात येत आहे. संरक्षित खारफुटी जेसीबीने गाडून त्यावर भराव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराची कांदळवन विभागाला माहितीच नसल्याचे समोर आल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी शेतकरी महिला तुलसी बुरांडे यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह विविध यंत्रणांकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार तुलसी विलास बुरांडे यांच्या अर्जानुसार, आक्षी येथील जुना सर्व्हे क्रमांक 225 आणि सध्याचा गट क्रमांक 38 (हिस्सा क्रमांक 7 अ, क्षेत्र 0-80-31 हे.आर.) ही शेतजमीन 1994 पासून त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात आणि वहिवाटीत आहे. या जमिनीत त्यांचे घर, विहीर, पंप रूम, शेतघर, गोठा आणि जवाहर योजनेतील 100 नारळाची झाडे आहेत. मात्र, बारा जणांनी या मिळकतीत अनधिकृत प्रवेश करून आरसीसी पोल आणि लोखंडी अँगलच्या सहाय्याने कुंपण उभारण्याचे काम सुरू केल्याचा आरोप आहे. यासोबतच सरकारी खाजणातील खारफुटीची कत्तल करून जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वी बुरांडे यांनी अलिबाग तहसीलदार न्यायालयात हरकत अर्ज क्रमांक 52/2026 आणि 53/2026 दाखल केले होते. तहसीलदारांनी हे अर्ज मंजूर करून फेरफार क्रमांक 19604 आणि 19605 बेकायदेशीर ठरवत रद्द केले. या निर्णयानंतर संबंधितांनी तक्रारदाराच्या जमिनीच्या पूर्वेकडील सरकारी खाजण (गट क्रमांक 36) मधील संरक्षित खारफुटी जेसीबीने जमिनीत गाडून त्यावर भराव टाकल्याचा आणि आरसीसी कुंपण उभारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सरकारी जागेवरील बांधकामामागे एका राजकीय नेत्याचा आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
संबंधित व्यक्ती कायदेशीरदृष्ट्या शेतकरी नसतानाही परस्पर खरेदीखते करण्यात आली असून, त्यासोबत जोडलेले नकाशे बोगस असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. प्रत्यक्ष जागेवर एकच विहीर आणि 100 नारळाची झाडे असताना दोन्ही खरेदीखतांमध्ये स्वतंत्र विहिरी आणि झाडे दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अनधिकृत काम थांबविण्यासाठी गेलेल्या तुलसी बुरांडे यांना दमदाटी करण्यात आल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्री, वनमंत्री, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, राज्य महिला आयोग, मानवी हक्क आयोग, कोकण विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही तक्रारी पाठविल्या आहेत.
एकीकडे खारफुटीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असताना दुसरीकडे सरकारी खाजणातील संरक्षित वनस्पतींची कत्तल आणि अतिक्रमण होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक कांदळवन विभागाला या प्रकाराची माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी खारफुटीवर अतिक्रमण होत असताना कांदळवन विभाग नेमका करतोय काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कुलदीप पाटकर,
पालव येथील कांदळवन आणि खारफुटीची कत्तल करून अतिक्रमण केले जात असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्यात येईल. मी स्वतःही घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असून, अतिक्रमण आढळल्यास संबंधितांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल.
वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग, अलिबाग
