अरविंद म्हात्रे यांची आक्रमक मागणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता तळोजा-खारघर सेक्टर-27 हा मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. हा मार्ग वेळेत सुरू न केल्यास स्थानिक नागरिक स्वतः रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरू करतील, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे. यासंदर्भात म्हात्रे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविले आहे. यापूर्वी दि.30 जुलै रोजी पत्र देऊनही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी पुन्हा सिडको प्रशासनाला धारेवर धरले आहे.
रक्षाबंधन आणि गौरी-गणपती उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होतात. त्यामुळे तळोजा, खारघर आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तळोजा ते खारघर सेक्टर 27 हा मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासह प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी सिडकोने विलंब न करता आवश्यक कार्यवाही करून हा मार्ग खुला करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. प्रशासनाने निर्णय घेण्यास आणखी विलंब केल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून अडथळे दूर करण्याची वेळ येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी पत्रातून दिला आहे. आता सिडको प्रशासन या मागणीची दखल घेऊन तातडीने रस्ता खुला करते की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







