। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिच्या वकिलपत्रावर स्वतःला निर्दोष मुक्त करायला बघताय, त्याच वकिलीणबाईविरोधात बोललं जातंय. अजुन वकिलपत्र सोडलेलं नाही, आता ती केस जिंकूनच दाखवा. उरणच्या खारेपाटात जन्माला आली आहे. आता वकिलीणबाई काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल. आमचा नाद करायचा नाही, असा सज्जड दम देत ॲड. मानसी म्हात्रे पुढे म्हणाल्या कि, जयंत पाटील यांनी खूप खिंडारं बघितली, पण छातीचा कोट करुन ते खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे. गोरगरीबांशी बांधिलकी जपणारा विचार नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, ॲड. दत्ता पाटील यांनी रुजविला आहे. त्यांच्या आदर्श व तत्त्वांवर प्रभावित होऊन कार्यकर्ते काम करीत आहेत. बुरूज तोडण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. शेकापमध्ये खिंडार पडले असे बोलले जात आहे. मात्र, आजच्या जमावाने साधा उंदीरदेखील जाणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ही निवडणूक प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली भरघोस मतांनी निवडून देण्याचे काम केले जाईल. भविष्यात अलिबागमध्ये विरोधकांना घुसू देणार नाही, असा विश्वास शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.

सत्तेसाठी काम न करणारा पक्षः प्रदीप नाईक
शेतकरी कामगार पक्षाने सत्तेसाठी काम केले नाही. मात्र, काही जण सोडून गेले. परंतु, शेतकरी कामगार पक्षावर आजही निष्ठावंत कार्यकर्त्याचे प्रेम आहे, हे आजच्या बैठकीतील जमावाने दाखवून दिले आहे. शेतकरी कामगार पक्ष आगामी काळात एक वेगळ्या पद्धतीने काम करेल, असा विश्वास शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला.

गेल्या घरी सुखी राहाः ॲड. गौतम पाटील
शेतकरी कामगार पक्षावर पिढ्यान्पिढ्या प्रेम करणारी पिढी आजही कायम आहे. आजच्या बैठकीतील कार्यकर्त्यांची गर्दी हीच खरी पक्षाची ताकद आहे. जे सोडून गेले, त्यांनी गेल्या घरी सुखी राहावे, असा टोला ॲड. गौतम पाटील यांनी लगावला. कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांना कोणतेही अधिकार राहणार नाहीत. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दबावाला बळी पडू नये. या संस्था आपण वाढविल्या आहेत. पुन्हा एकदा आपला आमदार झाला पाहिजे. या पद्धतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी केले.

सर्वसामान्य जनता शेकापसोबतः सुरेश घरत
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या रुपाने वाघासारखे नेतृत्व या रायगड जिल्ह्याला मिळाले. सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्ता घडविणारा कारखाना आहे. ज्यांना प्रशासकीय मान्यता हवी, ते सोडून गेले आहेत. चिऊताई यांनी गोरगरीबांशी बांधिलकी जपली. कोरोना काळात काम केले. गरीबांना धान्य दिले. गरीब गरजू मुलींसाठी सायकल दिली. त्यामुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनीच केली होती.

जनता तुमच्या पाठीशीः अनिल पाटील
शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले आहेत. जयंत पाटील यांच्या पाठीशी प्रचंड जनसमुदाय आहे. खारेपाटातील असंख्य मंडळी त्यांच्यासोबत आहेत, हे आजच्या जमावातून दिसून येत आहे, असे शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील म्हणाले.