। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेकापच्या कार्यकर्त्यांची बुधवारी (दि.16) सायंकाळी वेश्वी येथील निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांची गर्दी हीच खरी शक्ती आहे. काहीजण पक्ष सोडून गेल्याचे दुःख झाले नाही. मात्र, आईसमान सासूची बहिण आणि वडिलसमान सासऱ्याच्या भावानेच पक्ष सोडल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रु मी पाहिले, याचे दुःख खूप मोठे आहे, असे बोलताना शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये बसलेल्या अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटीलदेखील भावूक झाल्या. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत कार्यकर्ते आजही पाठीशी आहेत. सर्वजण एक वेगळ्या उमेदीने काम करून लाल बावट्याची सत्ता जिल्ह्यात निर्माण केली जाईल, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.

कार्यकर्तेच गद्दारांना जाब विचारतीलः सुरेश खैरे
आजची बैठक ही भाईंना हिंमत देण्यासाठी आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, ॲड. दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील यांच्याबरोबरच शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचा विचार, एक वेगळी ओळख राज्यात पोहोचविली. डावा विचार गावागावात रुजविण्याचे काम पाटील घराण्याने केले. अनेक लढे, आंदोलने लढली. गोरगरीबांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. मात्र, आपल्यातील काहींनी आज गद्दारी केली. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. जयंत पाटील हे पक्षनेतृत्व रायगडपुरते मर्यादित न राहता राज्यासह देशातील राजकारणात त्यांनी शेकापला एक वेगळी उंची निर्माण करुन दिली आहे. पक्षनेतृत्वाला दोष देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना सत्तेची सर्व दालने दिली. जिल्हा परिषद अर्थ सभापतीपासून जिल्हा परिषद अध्यक्ष अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये संधी दिली. मात्र, त्यांनीच गद्दारी केली. जयंत पाटील यांना ताकद देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असून, गद्दारांना जाब विचारण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये निष्ठेने काम करून त्यांची तोंडं बंद करण्याचे काम आपल्याला करायचे आहेत, असे शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे म्हणाले.

शेवटच्या माणसाठी काम करणारा पक्षः द्वारकानाथ नाईक
शेतकरी कामगारांचे नेते नारायण नागू पाटील यांच्यासह प्रभाकर पाटील व ॲड. दत्ता पाटील तसेच माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्यासारखे खंबीर नेतृत्व या जिल्ह्याला मिळाले. शेकापचे नेते जयंत पाटील यांनीदेखील त्यांच्या विचारांचा वारसा जपला. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम केले. त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, काही जण सोडून गेले. हा आघात जिव्हारी लागला आहे. शेतकरी कामगार पक्षाने सत्तेसाठी राजकारण केले नाही. श्रमजीवी, अन्यायग्रस्तांसाठी पक्ष स्थापन केला. या तत्त्वांवर निष्ठेने काम केले आहे. अनेकांना खासदार, आमदार बनविले. शेवटच्या माणसासाठी काम करणारा पक्ष आहे, असे शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक म्हणाले.

ज्यांना घडविले, त्यांना विसरायचे नाहीः हर्षदा मयेकर राजकारणाचे ज्ञान नव्हते. मात्र, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी पक्षाशी निष्ठा शिकविली. ज्यांनी घडविले, त्यांना विसरायचे नाही. आम्ही बदलणारे आणि विसरणारे नाहीत, असे मत नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी व्यक्त केले.