| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव-लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) संचालित बांबू कौशल्य आणि संशोधन केंद्राच्यावतीने मुरुड तालुक्यातील बारशिव येथील राधाकृष्ण मंदिरात बांबू प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला आणि युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देश या कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विशेषतः महिला व तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण 15 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बारशिवचे सरपंच हर्षद महाडिक, उपसरपंच प्रसाद चौलकर व प्रा. तेजस महागावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ग्रामीण भागातील महिलांना आणि युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. बांबू आधारित उद्योग हा पर्यावरणपूरक असून, कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय असल्याने स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी तो प्रभावी ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांना बांबूपासून आकर्षक राखी आणि कानातले तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी स्वतः विविध आकर्षक हस्तकला वस्तू तयार करत बांबू कलाकुसरीतील बारकावे शिकून घेतले. या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे तसेच भविष्यात स्वतःचा छोटा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याच्या भावना सहभागी महिलांनी व्यक्त केल्या.
