पोलादपूर नगरपंचायतीच्या कारभारावर विरोधक आक्रमक

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर नगरपंचायतीच्या वेगवेगळ्या विषयावरील भोंगळ कारभाराचे वाभाडे निघत असतानाच सोमवारी (दि.29) नगरपंचायतीच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ताच नगरपंचायतीने बंद होऊ दिल्याने विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. दरम्यान, पोलादपूर नगरपंचायतीच्या कार्यालयाची इमारतदेखील खासगी जमिनीवर उभी असून, कार्यालयासमोर पाणी पुरवठ्याची साठवण टाकीदेखील अस्तित्वात आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

पोलादपूर ग्रामपंचायतीच्या काळापासून सध्याच्या नगरपंचायत कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता वहिवाटीचा रस्ता आहे. दरम्यान, नगरपंचायत कंपाऊंड व प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या सैनिक इमारतीच्या बांधकामाचा एक खांब या रस्त्यावर उभारण्यासाठी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. परिणामी, नगरपंचायत कार्यालयाकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता बंद झाला आहे. मात्र, याकडे पोलादपूर नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. तसेच, नगररचनाकार आणि नगररचनेची महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या अधिकाऱ्यांना नियोजित बांधकामावेळी नगरपंचायत कार्यालयाचा रस्ता बंद होणार असल्याची जरादेखील कल्पना आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि हलगर्जीपणामुळे पोलादपूरकर जनतेला या नामुष्कीला सामोरे जावे लागत असल्याचे देखील बोलले जात आहे.

Exit mobile version