रसायनीत येणाऱ्या जैवप्रकल्पाला विरोध

| रसायनी | वार्ताहर |

मुंबई (गोवंडी) येथील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा एमआयडीसी येथे उभारण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे. मात्र, या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र विरोध दर्शवला आहे.

मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्यावतीने खालापूर तहसीलदार व पातळगंगा एमआयडीसी वरिष्ठ व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्हाधिकारी इतर संबंधित अधिकारी व विभाग यांना निवेदन येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात मनसेतर्फे जनजागृती करून या प्रकल्पाविरोधात तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल. मनसेतर्फे सर्व स्थानिक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादी यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून या आंदोलनात भावी पिढीकरिता स्थानिक स्वच्छ नैसर्गिक संपन्न परिसराकरिता एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचे काम करूया, आवश्यक वाटल्यास सर्वपक्षीय मिळवून एखादी स्थानिक सामाजिक संघटना स्थापन करून एकजुटीने या प्रकल्पाविरोधात आंदोलन उभे करूया, असे आव्हान मनसेचे दीपक कांबळी यांनी केले आहे.

Exit mobile version