| उरण | प्रतिनिधी |
केगाव येथील घरांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी मोठा फौजफाटा, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह धडक दिली. मात्र, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तीव्र विरोध दर्शविल्याने सिडकोच्या पथकाला कोणतीही कारवाई न करताच माघारी फिरावे लागले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे, उपनगराध्यक्ष रवी भोईर, नितीन पाटील, कमळाकर तांबोळी, राजेंद्र ठाकूर, पराग काठे, चिंतामण पाटील, सुनील नाईक, जगजीवन नाईक, महेश तांबोळी, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना कारवाईचा आधार, नोटीस आणि संबंधित कागदपत्रांची माहिती विचारत कारवाईला तीव्र विरोध केला. यावेळी सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी रजपूत यांनी भारतीय नौदलाकडून (नेव्ही) तक्रार प्राप्त झाल्याने कारवाईसाठी आल्याची माहिती सभापती महेश म्हात्रे यांना दिली. त्यानंतर म्हात्रे यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत सिडको, नेव्ही, महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून सर्व बाजू ऐकूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. ग्रामस्थांचा विरोध वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सिडकोच्या पथकाला माघार घ्यावी लागली. त्यानंतर ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी थेट उरण पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील आणि ग्रामविस्तार अधिकारी विनोद मिंडे यांना जाब विचारला. मात्र, या कारवाईची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे सांगत गटविकास अधिकाऱ्यांनी हात वर केले. तसेच वरिष्ठ स्तरावर कोणता निर्णय झाला आहे, याचीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केगावमधील घरांवर तातडीने कारवाईसाठी यंत्रणा धाव घेते, मात्र तालुक्यातील धुतुम व इतर परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कंटेनर यार्ड, पार्किंग व्यवसाय आणि अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का केले जाते? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.







