शर्यतीमधील बैलांच्या इअरटॅगला विरोध

| महाड | वृत्तसंस्था |

शर्यतीमध्ये सहभागी होणार्‍या बैलांच्या कानाला टॅग लावण्यास महाड, पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच समितीने विरोध दर्शविला आहे. तशा प्रकारचे निवेदन समितीतर्फे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. शुभांगिनी कवटे यांना दिले आहे. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार, कानाला टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी होता येणार नाही व तसेच पशुधन संदर्भातील वैद्यकीय सोयी सुविधा व योजनांचा लाभ पशुपालकांना मिळणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. एका बाजूला सरकार बैलगाडी शर्यतींना परवानगी देताना बैलांना कोणत्याही प्रकारे मारहाण व इजा होईल असे कृत्य करू नये, असे आदेश देते तर दुसरीकडे शर्यतीचे बैल आणि इतर पशुधनांच्या कानाला टॅग लावणे बंधनकारक केले जात आहे. हे परस्परविरोधी असल्याचे पंच समितीचे म्हणणे आहे. बैलगाडी स्पर्धा पंच समितीने बैलांच्या कामाला टॅग लावण्यास विरोध दर्शविलेला आहे व तसे निवेदन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्तांना दिले आहे. यावेळी महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच समितीचे उपाध्यक्ष स्वरूप खांबे, कार्याध्यक्ष अनिल कोदेरे उपस्थित होते.

इजा होण्याची शक्यता 
कानाला टॅगिंग करताना बैलांच्या कानाला इजा होते, तसेच वेदनाही होतात. जखम चिघळली तर कान तुटूही शकतो. शर्यतीमधील बैलांचे कान टवकारलेले असल्याने त्या आधारे ते आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेतात. टॅग लावल्याने त्याचा वजनाचा परिणाम कानावर, ऐकण्याच्या क्षमतेवर होऊन लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शर्यतीत बाधा येण्याची तसेच बैल उधळण्याची शक्यता आहे.
Exit mobile version