शेकापचे अनिल पाटील करणार पोलखोल
| रायगड | प्रतिनिधी |
जिंदाल स्टील लिमिटेडचा 10 ते 15 एमटीपीए इतका प्रकल्पविस्तार (फेज-3) म्हणजे रायगडच्या पर्यावरणावर आणखी एक घाला असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला आहे. 22 ऑगस्टला होणाऱ्या जनसुनावणीत या विस्ताराला ठाम विरोध नोंदवला जाणार असून, त्याबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी हरकत सादर केली आहे.
रायगडमध्ये आधीच जेएसडब्लू विरोधातील नाराजी उफाळून आली आहे. आता 22 ऑगस्टला होणारी जनसुनावणी ही केवळ औपचारिकता न राहता स्फोटक जनआक्रोशाचे व्यासपीठ ठरणार आहे. यादरम्यान, ग्रामस्थांनी देखील जेएसडब्लू कंपनीवर आक्रमक आरोप केले आहेत. ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल उपलब्धच नाही. लोकांना अभ्यासाची संधी देखील नाकारली. पहाटे दुर्गंधीयुक्त वायूचा त्रास होतो. तसेच, हवेतील लोखंडी कणांनी नागरिकांच्या फुफ्फुसांचे आजार बळकावत चालले आहेत. कामगार व ग्रामस्थांवर श्वसनविकारांचा प्रकोप होत असून तपासण्या व फिरत्या दवाखान्यांची सेवा देखील कंपनीकडून दिली जात नाही. कंपनीमुळे खाडी व उपखाड्या प्रदूषित झाल्या असून शेती, मत्स्यसंपदा आणि इकोसिस्टीम उद्ध्वस्त होत आहे. कंपनीत माल घेऊन येणाऱ्या जहाजांच्या लाटांमुळे बांध फुटून खारं पाणी शेतात व गावात शिरत आहे. त्यावर कंपनी ठोस उपाय करत नाही. कंपनीने टाकलेले स्लॅग म्हणजे एक प्रकारचा रासायनिक कचरा आहे. त्याचा अहवाल जाहीर न करता लोकांना विष दिले जात आहे. कंपनीच्या उत्पादनवाढीबरोबर कार्बन क्रेडिट योजना व उपाययोजना लपवण्यात येत आहेत, असे अनेक आरोप स्थानिकांनी केले आहेत. शेतकरी संघर्ष समितीचे सचिव व शेकापचे जिल्हा पदाधिकारी अनिल पाटील यांनी संतप्त भाषेत जेएसडब्लू कंपनीवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, कंपनीचा विस्तार म्हणजे नोकऱ्यांच्या नावाखाली नागरिकांना प्रत्यक्ष मृत्यूची भेट आहेच. त्यामुळे जनतेला फसवून, माहिती लपवून, प्रदूषणाचे राक्षसी कारखाने उभे करू देणार नाही. अन्यथा आम्हाला केंद्रीय पर्यावरण अपिल प्राधिकरणाची दारे ठोठावावी लागतील, असा स्पष्ट इशारा अनिल पाटील यांनी दिला आहे.
