। पाली/बेणसे । वार्ताहर ।
बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील स्थानिकांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये खदखदत आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील शेतकरी, पशुपालक, मच्छिमार 1 एप्रिल पासून बेणसे सिध्दार्थनगर पाण्याच्या टाकीलगत बेमुदत उपोषणास बसणार आहेत. या मागण्यांमध्ये ई.डी.पी.एल लाईन एक वर्षांपासून लिकेज झाल्याने शेतकऱ्यांचे, मच्छिमार व पशुपालक यांच्या व्यवसायावर केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे झालेली नुकसानभरपाई त्वरित मिळावी. स्थानिकांना रिलायन्स कंपनीत कायम स्वरूपी सामावून घ्यावे, वहिवाट मोकळी सोडून जाण्यायेण्याचा रस्ता द्यावा, कंपनीने बंधारा बांधून द्यावा, बौद्धवाडीसमोर कोणतीही संरक्षण भिंत घालू नये, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन यांनी उपाययोजना करावी, जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे, या मागण्यांसाठी बेणसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.