| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वतीने जुन्या मीटर ऐवजी नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे. स्मार्ट मीटर बसू नये अशी मागणी करावी निवेदन माथेरान वीज ग्राहक संघर्ष समितीने माथेरान येथील महावितरणचे सहायक अभियंता यांना दिले.
माथेरानमध्ये वीज मीटर बसवताना विद्युत ग्राहकांना पूर्वकल्पना देणे अपेक्षित आहे. कारण हे मीटर बसविल्यास अवाजवी विद्युत बिल येईल अशी विद्युत ग्राहकांची धारणा झाली आहे. मीटर बसविल्यास ते कसे काम करते त्याचे फायदे काय आहेत, त्याचा रिचार्ज संपल्यास त्याचा पुढील किती दिवसांचा कालावधी राहील ह्या सर्व शंकांचे निरसन होणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीकडे तर्फे शहरातील विद्युत ग्राहकांसाठी लघु चर्चासत्र आयोजित करण्यात यावी आणि तोपर्यंत स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात येऊ नये. तसेच माथेरान वीज वितरण संघर्ष समितीतर्फे निवेदन सादर केले असता सहायक अभियंता सचिन आटपाडे यांनी हे मान्य केले आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांसाठी लघुचर्चा सत्र आयोजित करण्यात येईल तत्पूर्वी संबंधित कर्मचारी स्मार्ट मीटर बसविण्यास सक्ती करत असेल तर आपण याची माहिती निवेदनात नमूद असलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला द्यावी असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी चंद्रकांत जाधव, आकाश चौधरी, राजेश दळवी, प्रदीप घावरे, राजेश चौधरी, वसंत कदम, कोंडीराम कदम आदी मंडळी उपस्थित होते.






