वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील हक्काचे आर्थिक उत्पन्न देणारे वेलची, मुठळी आणि पायपोशी या जातीच्या केळीचे पीक अनेक वाड्यातून भुईसपाट झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील काळ्याभोर आणि सुपीक मातीत नारळ-सुपारीच्या बागांमध्ये आंतरपीक म्हणून या केळींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावेळी योग्य प्रकारे वाढ होत असलेले केळीचे केळंबे वादळी वाऱ्यामुळे वाड्यांमधून भूईसपाट झाले आहेत. अनेक ठिकाणी केळंब्यांवर तयार होत असणारे केळीचे लोंगर फेकून देण्याशिवाय बागायतदारांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. या नुकसानीचा मोठा फटका तालुक्यातील अर्थकारणाला बसला आहे. मुठळी, वेलची आणि पायपोशी या केळी पीकावर महिला वर्गाचेही गृहउद्योग अवलंबून असल्याने त्यांच्या हाताचे काम देखील थांबले आहे.
तसेच, कोकण पट्ट्यात शुभकार्यावेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लोंगरासह केळीचे केळंबे लावण्याची सांस्कृतिक परंपरा आहे; मात्र, समृद्धीचे प्रतीक मानले जाणारे केळंबे वाऱ्याने कोलमडून पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीवर्धन तालुक्यात केळी पीकांचे उत्पादनक्षम हेक्टरी क्षेत्र 265.25 इतके असून, वादळी वाऱ्यामुळे 90.14 हेक्टरी क्षेत्रातील केळंब्यांची पडझड होऊन बागायतदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने बागायतदारांना आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा तालुक्यातील बागायतदारांकडून केली जात आहे.
यावेळी बेफाम वाऱ्यामुळे अनेक केळींचे केळंबे बुंद्यासकट पडले. त्यामध्ये आमचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून त्वरीत पंचनामा करण्यात यावा व आम्हाला शासनाकडून भरपाई मिळावी.
यशवंत शिंदे,
बागायतदार, केळस्कर पाखाडी







