रेवतळे येथे सेंद्रिय निविष्ठा प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन

| महाड | प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत एकात्मिक शेती विकास प्रकल्प हिंदवी महिला प्रभागसंघ, करंजाडी आणि पंचायत समिती, महाड यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत रेवतळे येथील बौद्धवाडी येथे सेंद्रिय निविष्ठा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे असे व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कार्यक्रमादरम्यान पंचायत समिती सदस्य संदीप खिडबिडे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्याचे फायदे विशद केले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे आरोग्य व सुपीकता जपण्यास, पर्यावरणाचे संरक्षण करण्यास आणि रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करून शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे या विषयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

सेंद्रिय निविष्ठा प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण होणार आहे. त्याचबरोबर महिलांना उत्पादन, विक्री आणि व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन विकसित करता येणार आहे. योग्य नियोजन, उत्पादनाची गुणवत्ता आणि बाजारपेठेतील मागणी यांचा विचार करून व्यवसायाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळू शकते.

महिलांनी व्यवसायात चिकाटी आणि जिद्द ठेवावी शकुंतला माने पंचायत समिती सदस्य यांनी महिलांच्या व्यवसायातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. व्यवसाय सुरू करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो सातत्याने आणि चिकाटीने पुढे नेणेही आवश्यक आहे. महिलांनी अडचणींना न घाबरता जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर व्यवसायात प्रगती साधावी व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला.

Exit mobile version