पर्यावरणपूरक मूर्तीच्या कार्यशाळांचे आयोजन

| पाली/बेणसे | वार्ताहर |

महाराष्ट्रासह कोकणातील सर्वात मोठा व लोकप्रिय गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच बाप्पाची मूर्ती भक्तिभावाने स्वतःच्या हाताने बनविण्याचा आनंद आणि समाधान काही औरच शिवाय ही मूर्ती पर्यावरण पूरक असेल तर आणखीच मज्जा पण मग सर्वच जण कलाकार किंवा मूर्तिकार नसतात, मात्र गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत जाऊन स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती बनविण्यास नक्कीच शिकता येते. त्यामुळेच स्वतःच्या हाताने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा जिल्ह्यात अनेक ठिकाणी होत आहेत. यामध्ये लहानांपासून मोठे देखील सहभागी होत आहेत.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, लहान मुले व मोठ्यांचे मातीशी दुरावत चाललेले नाते घट्ट करून, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आपले सण आणि आपली संस्कृती मनात रुजविण्यासाठी पालीत नेहा देशमुख यांच्याद्वारे या कार्यशाळेचे माफक दरात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत 7 वर्षांपुढील कोणीही सहभागी होऊ शकते. शिवाय उपस्थितांना कॅफे बीबीएम व डो टेल्स कडून अल्पोपहार दिला जाणार आहे. मूर्ती बनविण्यासाठी शाडू माती संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या कार्यशाळा जिल्ह्यात विविध ठिकाणी होत आहेत. काही शाळांमध्ये देखील या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्यामुळे लोक पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे वळतांना दिसत आहेत. या कार्यशाळेत साधारण 4 इंच मूर्तीपासून 9 व 12 इंच मूर्ती बनविल्या जातात. मार्गदर्शक कलाकाराच्या मार्गदर्शनाखाली सहभागी मुले व लोक विविध आकाराच्या मातीच्या मूर्ती स्वतः बनवितात व त्यांना रंग देखील देतात. स्वतःच्या हाताने मनोभावे बनवलेल्या या मूर्तीची गणेश जयंतीला प्रतिष्ठापना करतात. त्याचा काही वेगळाच आनंद मिळतो.

साहित्य
मूर्ती बनविण्यासाठी प्रामुख्याने टेराकोटा माती किंवा शाडूच्या मातीचा वापर होतो. याबरोबरच पर्यावरणस्नेही रंग वापरले जातात. कोरीवकाम करण्यासाठी छोटी लाकडाची अवजारे व रंग देण्यासाठी ब्रश लागतो.

रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईत देखील गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. विविध ठिकाणी तसेच शाळा महाविद्यालयात मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. या कार्यशाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.

नेहा देशमुख, आयोजक, सुधागड
Exit mobile version