समग्रने केला तब्बल सात लाखांचा खर्च
। रायगड । सुयोग आंग्रे ।
घर आणि शाळा असा दैनंदिन प्रवास करणार्या ग्रामीण आणि खास करून आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थ्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा विभागाने सुखद धक्का दिला. बाजाराच्या किंवा तालुक्याच्या गावाला कधीच न पोहचलेल्या विद्यार्थ्यांनी थेट कर्नाटक राज्यातील मंगलोर येथे आणि कोल्हापूर, रत्नागिरी येथे दस्तक दिली. निमित्त होते, समग्र शिक्षा अंतर्गत अविष्कार अभियान उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलींचे. रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरूड, अलिबाग, खालापूर, पोलादपूर आणि कर्जत तालुक्यातील आठ शाळांमधील 90 विद्यार्थ्यांची या सहलींसाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्यासमवेत 22 शिक्षकांची देखील शैक्षणिक सहल घडली.
इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण, आनंददायी शिक्षण रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त करणे सहज शक्य व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धी करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी राज्य सहलींचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील आठ शाळांमधील 90 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्राथमिकचे इयत्ता सहावी ते आठवीचे 40 आणि माध्यमिकच्या इयत्ता नववी ते बारावीच्या 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्राथमिकच्या प्रति विद्यार्थ्यांसाठी पाच हजार तर माध्यमिकच्या प्रति विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यामुळे सहलीसाठी तब्बल सात लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता.
राज्यातील कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सहलींसाठी प्राथमिक विभागातील खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ आणि पोलादपूर तालुक्यातील चरई तर माध्यमिक विभागातील खालापूर तालुक्यातील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय खोपोली आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस या शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, महालक्ष्मी मंदिर, कान्हेरी मठ, राधानगरी धरण, शाहू हायस्कुल, रत्नागिरी जिल्ह्यातील नाणिजमठ, गणपतीपुळे, डेरवण, परशुराम मठ, शाहू राजवाडा आदी ठिकाणांना भेट देऊन सहलीचा आनंद लुटला.
दुसर्या राज्यात सहलीसाठी कर्नाटक राज्याची निवड करण्यात आली. यासाठी प्राथमिक विभागातील रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा तळघर, मुरुड तालुक्यातील चोरढे तर माध्यमिक विभागातील रोहा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव आणि अलिबाग तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कोळघर या शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी कोकण रेल्वेतून प्रवास करीत कर्नाटक मंगलोर गाठले. तेथे या विद्यार्थ्यांनी पिलकुल्ला बायोलॉजिकल पार्क, तन्नीबावी किनारा, शाश्थुलू किनारा, बोन्डा आयस्क्रीम फॅक्टरी, कादरी पार्क, सोमेश्वर मंदिर, फोरम मॉल, नंदानी नदी, मंजुनाथ मंदिर, गोकर्ण मंदिर, सुलतान बॅटरी, मंगलोर पोर्ट, सेंट अलॉयसूस चॅपल, गोल्फ कोर्ट, उडपी, तरंगता पूल, कृष्ण मठ, नाणे संग्रहालय, हस्तशिल्प वारसा गाव, फातिमा चर्च, गोमटेश्वर पुतळा, चतुर्भुज जैन बसदी, कप्पू किनारा या ठिकाणी भेटी दिल्या.







