कुलाबा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त रायगड काँग्रेस सेवा फाऊंडेशन, मा. आमदार मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, भाई जगताप मित्र मंडळ आणि अ‍ॅड. उमेशदादा ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी रोजी युवक मार्गदर्शन तथा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे 14 वे वर्ष असून, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पत्रकारिता तसेच वैद्यकीय क्षेत्रातील बहुसंख्य गुणीजनांना ‘कुलाबा जीवन गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीही राज्यभरातील बहुसंख्य गुणीजनांना ‘कुलाबा जीवन गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने कुलाबा जीवन गौरव पुरस्कार समितीच्यावतीने राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पत्रकारिता तसेच, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणीजनांनी माहितीच्या स्वयंघोषित सत्यतेसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर स्वतःची वैयक्तिक माहिती, सदयःस्थिती, कारकीर्द आदींचा उल्लेख तसेच कामाचा सविस्तर आढावा, संक्षिप्त माहितीसह संबंधित छायाचित्रे, प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, वृत्तपत्र किंवा बातम्या कात्रणांच्या छायांकित प्रती, शिफारसपत्रे या स्वरूपात माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आकाश घरत (7208549317) व रुचिता शिंदे (8237118983) यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version