नागोठण्यात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्यातील प्रभू आळी भागातील तरुणांकडून स्थापन करण्यात आलेल्या श्री सन्मित्र मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. येथील जुने रामेश्वर मंदिरात दरवर्षी साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवानिमित दहा दिवसांच्या उत्सव काळात विविध अशा भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष उदय भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला मंडळाचे कार्याध्यक्ष कीर्तीकुमार कळस, सचिव धनाजी दपके, सहसचिव संदेश सुकाळे, खजिनदार राजेंद्र गुरव आदींसह सदस्य उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष उदय भिसे यांनी दहा दिवसांतील विविध कार्यक्रमांच्या संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली.

नागोठण्यात आलेला 1989 च्या महापुरात येथील मोरे बंधू यांचा मूर्ती कारखाण्याचे संपूर्ण नुकसान झाल्याने ते वर्ष वगळता मंडळाने स्थापनेपासून नागोठण्यातील मोरे बंधू यांच्या मूर्ती कार्यशाळेतूनच व कमी उंचीची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करण्याची आपली प्रथा यावर्षीही कायम ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी 20 सप्टेंबरला रात्री 8 वा. मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन, 21 सप्टेंबरला रात्री 9 वा. कोलाड येथील श्री स्वामी समर्थ भजन मंडळाचे भजन, 22 सप्टेंबरला रात्री 9.30 वा. स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, 23 सप्टेंबरला रात्री जागर, 24 सप्टेंबरला दुपारी 4 वा. पाटोदे, जि. औरंगाबाद येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांचे व्याख्यान, 25 सप्टेंबरला दुपारी 3 वा. स्थानिक मिमिक्री कलाकार एम. जयकुमार यांची मिमिक्री नंतर मंडळातील सदस्यांचा व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा आणि गणेशोत्सवात महत्वपूर्ण योगदान असलेल्या व्यक्तींचा सत्कार, रात्री 8 ते 9.30 वा. करण्यात येणार आहे. महिलांसाठी पाककला स्पर्धा, 26 सप्टेंबरला गणेश याग, होम मिनिस्टर व मराठी गाण्यांचा कार्यक्रम, 27 सप्टेंबरला सत्यनारायण महापूजा, रोहे येथील महिला मंडळाचे भजन, रात्री मराठी पाऊल पडते पुढेफफ हा ऑर्केस्ट्रा तर 28 सप्टेंबरला श्री गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक अशा वैविध्यपूर्ण भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version