राज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

| पुणे | प्रतिनिधी |

सतेज संघ, बाणेर आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या 71 व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 15 ते 20 जुलै दरम्यान पुण्यात होत आहेत. या स्पर्धेच्या बरोबरीनेच पुणे लीग कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या सहकार्याने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत बॅडमिंटन हॉलमध्ये या सर्व स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम 15 ते 17 जुलै दरम्यान पुरुष आणि 18 ते 20 जुलै दरम्यान महिलांच्या स्पर्धा होणार आहेत. दोन्ही अंतिम लढती 20 जुलै रोजी खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धा मॅटवर होणार असून, यासाठी 6 क्रीडांगणे आखण्यात आली आहेत. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील जिल्हा संघटनांचे संघ वाढविण्यात येण्याच्या राज्य संघटनेच्या धोरणात्मक निर्णयानुसार होणारी वरिष्ठ गटाची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. यामुळे आता स्पर्धेत पूर्वीच्या 25 जिल्हा संघाऐवजी पुरुष, महिलांचे प्रत्येकी 31 संघ सहभागी होतील. यामध्ये ठाण्याकडून दोन (शहर, ग्रामिण), मुंबई शहमधून दोन (मध्य आणि पश्चिम), मुंबई उपनगरमधून दोन (मध्य, पश्चिम), नाशिकमधून दोन (शहर, ग्रामिण) आणि पुण्यातून तीन (शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड) संघाचा समावेश असेल.

या स्पर्धे दरम्यानच कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा कबड्डी दिनाचा कार्यक्रमही पुण्यातच पंधरा जुलैला होणार आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धां बरोबरीनेच होणाऱ्या पुणे लीग स्पर्धेत निवड चाचणीतून पुरुषांचे आठ आणि महिलांचे सहा संघ निवडण्यात आले आहेत. या संघात ही स्पर्धा पार पडले. सर्व स्पर्धेसाठी आखण्यात आलेल्या सहा पैकी एका क्रीडांगणावर लीगचे सामने होणार आहेत.

Exit mobile version