। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दरवर्षीप्रमाणेच आगामी आयपीएल हंगामातही काही संघांचे कर्णधार बदललेले दिसणार आहेत, ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. आयपीएल 2024 मध्ये राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊकडून खेळलेला अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने याबाबत मोठा खुलासा केला आहे. केएल राहुल आयपीएल 2022 पासून लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. त्याच्या संघाने पहिल्या दोन हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले, परंतु आयपीएल 2024 मध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचवेळी, नुकत्याच झालेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात एकतर्फी पराभव झाल्यानंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंकाही केएल राहुलवर नाराज दिसले होते. या प्रकरणाने बरीच चर्चा रंगली होती. तेव्हापासून अशी अटकळ बांधली जात आहे की कदाचित एलएसजी संघ पुढील हंगामासाठी कर्णधारपद बदलू शकतो.







