। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघ येत्या काही दिवसांत श्रीलंका दौर्यासाठी रवाना होणार आहे. राहुल द्रविड याच्यानंतर गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना अगामी एक दिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. एक दिवसीय मालिका 2 ते 7 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. पण, हार्दिकने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेत खेळू शकत नसल्याचे बीसीसीआयला सांगितले आहे. हार्दिक व पत्नी नताश स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. याबाबत दोघांकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी काही तरी नक्की गडबड असल्याचे संकेत दोघांकडून अप्रत्यक्षपणे मिळाले आहेत.







