साहित्यसंपदा आणि इतर संस्थांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
साहित्यसंपदा, शिवधारा ट्रेकर्स, तेजस्विनी सांस्कृतिक आणि सामाजिक फाउंडेशन अलिबाग आणि नादब्रह्म एक स्वराविष्कार गिरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मआम्ही समाजाचे देणे लागतोफ उपक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला. साहित्य, कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. केवळ आपल्या क्षेत्रापूरते मर्यादित न राहता सामाजिक भान जपत एकत्र येऊन केलेल्या उपक्रमाबद्दलची माहिती साहित्य संपदा प्रमुख वैभव धनावडे यांनी दिली. महाड, पोलादपूर येथील पूरग्रस्तांना व रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटलेल्या गावांसाठी नुकतीच या संस्थांमार्फत मदत देण्यात आली. रिलायन्स नागोठणेचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, कवी, स्तंभलेखक रमेश धनावडे, साहित्य संपदा संस्थापक वैभव धनावडे, प्रांताधिकारी पेण विठ्ठल इनामदार, तहसिलदार पोलादपूर समिर देसाई, रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, मंडळ अधिकारी लक्ष्मिकांत सिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना अन्नधान्य, चादर, कपडे, ब्लँकेट पाणी, सॅनेटरी पॅड्स आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी, रमेश धनावडे, वैभव धनावडे, जिवीता पाटील तसेच लालसिंग वैराट, सुनील मत्रे, पूनम धनावडे, मेहुल पटेल, ओंकार पवार, ओंकार वर्तक, यश पाटील, सिद्धी गुंड या सर्वांनी या दुर्गम भागात प्रत्यक्ष उपस्थित राहून मदत पोहचवली. याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे टोक असलेल्या पोलादपूरमधील संपर्क तुटलेल्या 53 गावांना या सर्वांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून प्रत्यक्ष मदत पोहचवून माणुसकीचे उत्तम दर्शन घडवले. 500 हून अधिक कुटुंबाना प्रत्यक्षरित्या ही मदत पोहचविण्यात आली. महाड, पोलादपूर शहरातील तसेच, रानबिजरे आदिवासी वाडी,भराववाडी, राखीचा टोक, सुतारपेढा, कोसमवाडी कुंबलवणी, चिरेखिंड, सुतार पेढा, वाडा कुंबरोशी आणि इतर गावांना ही मदत पोहचविण्यात आली. विशेष म्हणजे फक्त साहित्यिकच नाही तर ट्रेकिंग क्षेत्रातील संस्था सुद्धा सदर उपक्रमात अग्रेसर होत्या. ट्रेकिंग मध्ये नावाजलेल्या राहुल तवटे संस्थापित शिवधारा ट्रेकर्स संस्थेने मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात मदत गोळा करण्यास हातभार लावला. नियोजनाची सर्व जवाबदारी त्यांनी यशवीरित्या पार पाडली. साहित्यसंपदा सदस्यांबरोबरच टीम इंडिया आउटडोर, नादब्रह्म एक स्वराविष्कार (गिरगांव) संस्था सदस्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थितीत राहून ही मदत घरोघर पोहचवण्यास हातभार लावला. या प्रसंगी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ.शीतलताई मालुसरे यांची सदिच्छा भेट घेतली गेली व त्यांच्या उपस्थितीतही उपरोक्त वस्तूंचे व कपड्यांचे वाटप करण्यात आले.

या संस्थांनी केलेल्या मदतीबाबत प्रांताधिकारी महाड प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी रोहा यशवंतराव माने, तहसिलदार पोलादपूर तसेच विविध सरकारी अधिकारी व समाजातील विविध स्तरांमधून समाजभान जपत कार्यरत असणा-या या संस्थांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Exit mobile version