जिल्हा न्यायाधीशांचे प्रतिपादन,पनवेलमध्ये प्रदर्शन
। पनवेल । वार्ताहर ।
समाजाच्या सर्वच स्तरापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला असून तो सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल असे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश एस. एस. सावंत यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पनवेल परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त पंकज डहाणे,सरकारी वकील भूषण साळवी, न्या. अशोककुमार भिल्लारे,न्या. जयराज वडणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव पाटील, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, श्री साई संस्थान वहाळचे रवींद्र पाटील, आदींसह इतर मान्यवर व मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ व मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून आलेले नागरिक व वकील उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितले की, शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचल्याने त्याचा फायदा सर्वांनाच होतो. रायगड जिल्ह्यात अश्याप्रकारे मार्गदर्शन वेळोवेळी या योजनेद्वारे करण्यात येते. आजचा हा कार्यक्रम सुद्धा कौतुकास्पद आहे त्यामुळे अनेकांना विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नागरिकांना लाभदायी ठरणार्या 18 योजनांचे स्टॉल्स येथे उभारण्यात आलेले असून, 31 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाची सांगता होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापुढील महामेळावा महाड येथे भरवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना विविध शासकीय दाखले, धनादेश आदींचे वाटप करण्यात आले.
सामान्य माणूस हा सुद्धा पोलिसच असतो. जनजागृत राहून त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मदत कक्ष व समुपदेशन आदी उपक्रम राबवले जातात. आजच्या तरुण पिढीला गुन्हेगारी व व्यसनमुक्त करण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न असेल, असे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.