। पोयनाड । प्रतिनिधी ।
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पोयनाडतर्फे दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल पाटील, किशोर तावडे, देवेंद्र केळुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवप्रतिमेचे पूजन पोयनाड सरपंच भूषण चवरकर यांनी केले. त्यानंतर जेष्ठ नागरिकांनी भजन सेवा करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. दुपारी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील शिवप्रेमींनी संगीतखुर्ची स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला. सायंकाळी शिवप्रतिमेचे सवाद्य पालखी मिरवणूक संपूर्ण पोयनाड गावातून निघाली, रा.जि.प. प्राथमिक शाळा मांडवा येथील लेझीम पथकांनी मिरवणुकीत आपली कला सादर करून भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे प्रदर्शन केले. जय भवानी जय शिवरायाच्या घोषणांनी पोयनाड बाजारपेठ दणाणली. दुसर्या दिवशी दि. 20 फेब्रुवारीला सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोयनाडच्या युवा मुलामुलींनी आपली नृत्यकला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. पोयनाड गावातील गुणवंत विध्यार्थीचा व विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अँड. पंकज पंडित, डॉ. जिना प्रदिप जैन, अनिकेत संदेश चवरकर, अद्वैत देवेंद्र केळुस्कर, सौरभ दिलीप कारेकर यांचा सत्कार उत्सव समिती तर्फे करण्यात आला.