| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रौढ गटातील क्रिकेट सामन्यांचे रायगड जिल्हातील विविध मैदानांवर आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट मैदान, नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदान, रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स मैदान व गव्हाण उलवे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सदरच्या सामन्यांचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने आयोजन केले जाणार असून सामने दोन दिवसीय कसोटी फॉरमॅट नुसार होतील. एमसीए आयोजित प्रौढ गटातील क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप डी मध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघासह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन, वायएमसीए क्रिकेट क्लब, सीडीए क्रिकेट क्लब पुणे, सीओएम क्रिकेट क्लब पुणे व सेंट्रल झोन अशा सहा संघामध्ये साखळी फेरीतील एकूण 15 दोन दिवसीय सामने खेळले जातील. या सामन्यांसाठी रायगड जिल्ह्यातील एमसीए प्रमाणित पंच व गुणलेखक सामना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य सामन्यांचे यशस्वी रित्या आयोजन व्हावे यासाठी परिश्रम घेत आहेत.रायगड जिल्ह्यातील सर्व युवा क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमी लोकांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन आरडीसीए तर्फे करण्यात आले आहे.





