पनवेल महानगरपालिका तथा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत पनवेल महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महापालिका क्षेत्र आणि तालुका भागातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष शिबीराचे आयोजन महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालय याठिकाणी करण्यात आले होते.
याप्रसंगी महापौर कविता किशोर चौतमोल, नगरसेवक डॉ. अरूण कुमार भगत, नगरसेविका मोनिका महानवर, आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्य्क आयुक्त सुवर्णा दखणे, वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय डॉ. सचिन सपकाळ उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील दिव्यागांना प्रमाणपत्रासाठी अलिबागला जावे लागत होते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन दिव्यांगांना पनवेलमध्येच या शिबिराच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्धकरून देण्यात आले. तसेच यापुढेही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणे करून दिव्यांगांचे कष्ट कमी होतील.असे आश्वासन यावेळी आयुक्त देशमुख यांनी यावेळी दिले.
या शिबिरामध्ये अस्थिव्यंग तज्ञ, नेत्र तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, भिषक असे विविध तज्ञ सहभागी झाले होते. या शिबीरात जवळपास 300 दिव्यागांनी सहभाग घेतला. या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र हे नि:शुल्क देण्यात आले.
हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयुक्त श्री.देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा समाज कल्याण विभाग, डॉ. सुरेश पंडित तसेच वैद्यकिय आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्स ,परिचारिका, कर्मचारी यांनी सहकार्य केले.