‘त्‍या’ चोरी करणाऱ्या महिला सराईत

| अलिबाग | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना अलिबाग एसटी स्थानकात तीन महिलांनी पर्समधील 11 हजार 500 रुपयांची रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. एसटी बस कर्मचारी व पोलीसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. ताब्यात घेतलेल्या तीन महिलांपैकी दोन महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका महिलेविरोधात मुंबई, ठाणे, पुणे जिल्ह्यातील 20 पोलीस ठाण्यात तर दुसऱ्या महिलेविरोधात औरंगाबाद, लातूर जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवार 19 सप्टेंबरला गणरायाचे आगमन घरोघरी होणार असल्याने आदल्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी अलिबागमध्ये खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली होती. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील सुचिता कडवे ही महिला दुपारी अलिबाग एसटी बस स्थानकात उभी होती. रेवस एसटीबस फलाटावर लागल्यावर महिला बसमध्ये चढत होती. दरम्यान दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत तीन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील 11 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली. ही बाब कडवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गोंगाट केला. तेथील वाहकाने सतर्कता दाखवत बस एसटी बस आगारात नेली. त्यानंतर पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे, पोलीस हवालदार हर्षल पाटील, सदानंद झिराडकर, सचिन शेलार, महेश जाधव, महिला पोलीस शिपाई अंकीता घवाळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने शोध सुरु केला. त्यावेळी एसटीबसमध्ये बसलेल्या तीन महिलांनी चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेऊन अलिबाग पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक संजीवनी पाटील यांनी केला.

तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या तीन महिलांपैकी दोन महिलांविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सुमन काळे विरोधात 20 तर बबीता उपाध्येविरोधात तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना पेण पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यात संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांचा पुढील चौकशी पेण पोलीसांनी सुरु केली आहे.

Exit mobile version