स्वयंपाक घरातुन तांबा- पितळेची भांडी कालबाह्य

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची व पितळेची भांडी मोठ्या संख्येने वापरली जात होती. त्याचा औषधी गुणधर्मही लोकांना ठाऊक होता. मात्र बदल्या जीवनशैलीचा परिणाम तांबा व पितळेच्या भांडयावरही पडल्याने परिणामी प्राचीन काळापासून वापरात असलेली ही भांडी आज अनेक घरांमधुन कालबाह्य झाल्याचे दिसुन येत आहे. या पितळेच्या व तांब्याच्या भांड्याची जागा आता स्टेनलेस स्टीलच्या व फायबरच्या भांड्यांनी घेतली आहे. आरोग्य सुद्ढ रहावे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र काळाच्या ओघात ही भांडी दुर्मिळ झाल्याचे चित्र ग्रामीण भागांसह शहरात ही दिसुन येत आहे. सध्या दैनंदिन वापरात स्टील,फायबर यांचा वापर वाढत असल्याने आरोग्य करिता धोक्याची ठरते तरी तांबा व पितळ भांड्यांचा गरज ओळखणे काळाची गरज आहे. जुन ते सोन असे म्हणतात पण सध्या हेच सोने कवडीमोल दराने विकले जात आहे. एकेकाळी स्वयंपाकगृहाचा कणा असलेली तांब्या आणि पितळेची भांडी स्वयंपाकगृहातून नव्हे तर अगदी घरातुनच हद्दपार होताना दिसत आहे, यांची जागा आता स्टिलने घेतली आहे.

ऐतिहासिक अनं पारंपारिक अशा जुन्या स्मृती ठराविक लोकांकडुनच जपल्या जातात काही वेळा त्याना उजाळाही देण्याचे काम केले जाते.काही ठिकाणी मात्र हाच जुना ठेवा नाहिसा करण्याचं काम केल जाते. वर्षानुवर्ष जतन करून ठेवला जाणारा लाखमोलाचा ठेवा आता मोडीत काढल्याने कालबाह्य झाला आहे. आज ही ग्रामीण भागात जुन्या तांब्या- पितळयाची भांडी कचितच पाहायला मिळत आहे. पूर्वी पितळेची समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा याचा वापर जास्त करून देवपूजा करण्यासाठीच केला जायचा मात्र काळाच्या ओघात ही देवपूजेची भांडी दुर्मिळ होत गेली.

लग्न समारंभात रूकवतात ठेवल्या जाणाऱ्या पितळेच्या तांब्याच्या भांडयाची जागा स्टीलच्या भांडयानी घेतली आहे. वजनला हलके आणि स्वस्त असलेल्या स्टील व अल्युमिनियम पासुन बनविण्यात आलेली ताट, वाटी, चमचा आदी भांडी लग्न वास्तुशांती अशा कार्यक्रमांमध्ये आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहेत.परंतू अलिकडच्या काळात तांबे, पितळ अशा धातूपासून तयार केलेली ताट, वाटी, चमचा, तपेले, बादली, परात, कळशी, हंडा, आदी भांडी कालबाह्य झाली आहेत. अशी काही भांडी जर जतन करून ठेवली नाहीतर भविष्यात ही भांडी पाहण्यासाठी मिळणार नाहीत अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळेल.

Exit mobile version