।दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यामध्ये महावितरणकडून कुठलीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दिवसभर उन्हाच्या झळाणी हैराण झालेल्या येथील रहिवाशांचा बुधवारी रात्री अकरा वाजताच्या लोडशेडिंगमुळे संतापाचा पारा चढला आहे. वीज वितरण कंपनीकडे याची कोणतीही माहिती नसल्याने येथील नागरिक मोठया पेचात अडकला आहे.
बोर्लीपंचतन विभागातील महावितरणचे गोंडघर सबस्टेशन असून दिघी, कुडगाव, नानवली, आदगाव, वेळास, वडवली, शिस्ते, दिवेआगर तसेच बोर्लीपंचतन अशा प्रमुख गावांसह वीस ते पंचवीस वाड्यांचा विद्युत पुरवठा येथूनच सुरू आहे. मागील दोन दिवसात येथील विद्युत सप्लाय अचानक बंद होत असल्याने दिवेआगर, वडवली अशा दुय्यम अभियंता कार्यालयातील अधिकार्यांना विचारले असता आम्हाला याची माहिती नसल्याचे सांगण्यात येत असल्याने महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणने बुधवारी तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक भागांत अचानक दोन तासांपर्यंत लोडशेडिंग केले. ज्या भागात अधिक विजेची गरज आहे. अशा भागांत लोडशेडिंग करण्यात येत आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त झाल्याने अनेक नागरिकांनी शहरातील महावितरणच्या कार्यालयात फोन करून आपला संताप व्यक्त केला. अधिकार्यांचे फोन खणखणत होते. मात्र, अभियंत्यांनी अक्षरश: याकडे दुर्लक्ष केले. बोर्लीपंचतन परिसरातील गावांतील दररोज रात्रीच्या वेळी दोन तास लोडशेडिंग सुरू आहे. याची कल्पना देखील येथील महावितरणच्या वरिष्ठांना नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा प्रश्न भेडसावत आहे. लोडशेडिंगच्या समस्येबद्दल जाब विचारण्यात आला. मात्र, कोणतीही माहिती नसणार्या महावितरणच्या कर्मचार्यांची उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली.
लोडशेडिंगच्या झटक्याने संतापाचा भडका
