खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप

कोट्यवधींचा रस्ता सहा महिन्यांत उखडला; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी खोरा बंदर येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली नवीन पर्यटन जेटी तयार झाली असली, तरी तिच्याकडे जाणारा अंतर्गत सिमेंट काँक्रिटचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांत उखडल्याने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदराच्या मुख्य रस्त्यापासून जेटीपर्यंतचा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता आणि पार्किंग परिसर शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून विकसित केला. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याचे काँक्रिट उखडू लागले. अनेक ठिकाणी सिमेंटचा भुसा आणि खडी बाहेर आली असून, रस्ता पुन्हा खड्डेमय बनला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरून वाहन गेले की सिमेंटचा भुसा हवेत उडून पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या डोळ्यात, नाकात व तोंडात जात आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर पाण्याने भरलेले खड्डे निर्माण झाले असून, अपघाताचा धोका वाढला आहे. याच मार्गावर उभारण्यात आलेले स्पीडब्रेकरही नियमबाह्य असल्याचा आरोप आहे. ते अतिशय उंच आणि अरुंद असल्याने वाहनांना जोरदार धक्के बसत असून, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही स्पीडब्रेकर दुरुस्त करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेष म्हणजे, पुढील काही महिन्यांत पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांना याच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागणार असल्याने पर्यटनालाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


खोरा बंदर पार्किंग आणि अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचे कार्यादेश देण्यात आले आहेत. सध्या पावसाळी काळात वाहतूक सुरू असल्याने काम सुरू करता येत नाही. संबंधित ठेकेदार अगरदांडा येथील काम पूर्ण करताच खोरा बंदरातील दुरुस्तीला सुरुवात होईल. यावेळी दर्जेदार काम होईल, याची आम्ही स्वतः लक्ष ठेवून खात्री करू.

प्रवीण पाटील,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई
Exit mobile version