पनवेल पालिकेच्या निकृष्ट कामावर संताप

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून खारघर परिसरात “खड्डेमुक्त रस्ते” आणि “उत्तम दर्जाचे रस्ते” झाल्याचा गाजावाजा केला जात आहे. विविध माध्यमांमधून चांगल्या कामाची प्रसिद्धी केली जात आहे. परंतु, वास्तव परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि चिंताजनक आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह शिसवेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त केला आहे.

खारघर सेक्टर 17, 16 आणि 15 या भागातील अत्यंत वर्दळीचा मुख्य रस्ता पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या मध्यभागी असलेले ड्रेनेज झाकण (चेंबर) रस्त्यापेक्षा 5 ते 10 इंच खाली आहे. त्यामुळे वाहन चालवताना अचानक धक्का बसून अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खड्डे / खटक्या असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. आधीच अनेक किरकोळ अपघात घडले असून, मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व असूनही संबंधित यंत्रणेकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा पूर्ण झालेला रस्ता आहे का? कामाचा दर्जा तपासला गेला आहे का? एखादा गंभीर अपघात झाल्यावरच कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, या ठिकाणची तात्काळ रस्त्याची तांत्रिक पाहणी करण्यात यावी. ड्रेनेज झाकण व रस्त्याची पातळी समतोल करण्यात यावी. दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन कामाची पुनर्तपासणी करावी, अशी मागणी खारघर सेक्टर 16 येथील रहिवाशी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे यांनी केली आहे.

Exit mobile version