| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरात नात्यांना काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आत्याच्या पतीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारातून ती पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पनवेलमधील आत्याकडे राहत होती. मात्र, तिच्या निराधारतेचा फायदा घेत आत्याच्या पतीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. पीडिता लहान असल्यामुळे ती घाबरून गेली आणि कुणालाही ही बाब सांगू शकली नाही. अलीकडेच पीडित मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तिने मावशीला “पोटात काहीतरी फिरतंय” असे सांगितले. तिच्या बोलण्यावरून संशय आल्याने मावशीने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर धक्का बसलेल्या मावशीने मुलीसह थेट पनवेल शहर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
