महाडमध्ये जल प्रदूषणाचा हैदोस

। महाड । प्रतिनिधी ।
महाड औधोगिक क्षेत्रातील प्रदूषण थांबण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसापासून पुन्हा टेमघर नाला केमिकलच्या पाण्याने प्रदूषित झाला आहे. तर औद्योगिक क्षेत्रातील जवळपास 60 टक्के नाले पुन्हा रसायनाच्या पाण्याने भरले असून या जलप्रदूषणामुळे अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात वायू आणि जल प्रदूषण सुरू आहे. येथील कारखानदार कधी पावसाचा तर कधी छुप्या मार्गाने कारखान्याच्या शेजारी असलेल्या गटारांमध्ये घातक रसायने सोडण्याचे उद्योग करीत आहेत. याचा फटका काही दिवसांपूर्वी 18 गावांच्या पिण्याच्या पाण्याला बसला होता. या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नसताना दोन दिवसांपासून पुन्हा या औद्योगिक क्षेत्रातील टेमघर नाला मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे. या नाल्याचे पाणी पुन्हा सावित्री नदीला आणि औद्योगिक परिसरत तसेच खाडीपट्ट्यासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये मिसळणार असल्याने पिण्याचे पाणी पुन्हा प्रदूषित होण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, या टेमघर नाल्यावर काही मोजकेच कारखाने आहेत. अशावेळी कोणता कारखाना घातक रसायने सोडत आहे, याचा छडा प्रदूषण नियंत्रण मंडळाला लावता येत नसल्याने त्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघड झाला आहे.

कारवाई करतो हेच उत्तर
सध्याच्या परिस्थितीत पुन्हा झालेले टेमघर नाल्याचे प्रदूषण परिसरातील अनेक गावांना भोवणार आहे. मात्र असे असतानाही टेमघर नाल्यातील प्रदूषणाबाबत अद्याप कोणतीच पावले प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उचलली गेली नाहीत. हे मंडळ कारवाईकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत आहे; नाही तर पुन्हा नमुने घेतो, अहवाल आल्यानंतर कारवाई करतो असे मोघम उत्तर देऊन सर्वांची बोलवण केली जात आहे.

Exit mobile version